महासंकटाच्या काळात ‘मैत्री’चा आधार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असताना बाहेरगावचे असलेले आणि नागपुरात अडकलेले विद्यार्थी, निराधार ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि नागपुरात अडकलेल्या बाहेरगावच्या व्यक्तींच्या मदतीसाठी नागपूर महानगरपालिकेच्या आवाहनाला साद देत अनेक सामाजिक संस्था धावून आल्या. मनपाच्या नेतृत्वात या सामाजिक संस्थांनी अशा व्यक्तींना आधार दिला. यातीलच एक संस्था म्हणजे मैत्री परिवार. अन्नदानाचे महत्‌कार्य करीत ‘मैत्री’ने गरजूंना दिलेला आधार लाख मोलाचा ठरत आहे.

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील अशा व्यक्तींच्या मदतीसाठी स्वयंसेवी संस्थांना हाक दिली. शहरातील २७ ठिकाणी कम्युनिटी किचन उघडून ज्या व्यक्तींना भोजनाची आवश्यकता आहे अशा व्यक्तींना दोन वेळचे भोजन पुरविण्याचे कार्य नागपूर महानगरपालिकेने सुरू केले. यामध्ये शहरातील अग्रणी सेवाभावी संस्था ‘मैत्री परिवारा’चे कार्य प्रशंसनीय ठरले आहे.
मैत्री परिवाराने २५ मार्चपासून लॉकडाऊनच्या काळात बाहेरगावचे होस्टलवर किंवा रुमवर राहणारे विद्यार्थी ज्यांच्याकडे जेवणाची काही सोय नाही अशांना भोजन पुरविण्याची व्यवस्था उभारली. प्रारंभी ४१६ व्यक्तींना कोतवाली पोलिस ठाण्याच्या माध्यमातून भोजन पुरविण्याची सुरुवात झाली. हळूहळू हा आकडा वाढत गेला. २९ मार्चपासून मैत्री परिवाराने संस्थेच्या नेटवर्कच्या माध्यमातून सेवा देण्यास प्रारंभ केला. आज सुमारे २५०० विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आदींना फूड पॅकेट पोहचविण्यात येतात.
मैत्री परिवाराच्या किचनमधून तयार झालेल्या फूड पॅकेटस्‌पैकी ८७३ व्यक्तींना मैत्री परिवार स्वयंसेवकांच्या माध्यमातून, १७५ फूड पॅकेटस्‌ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून, १०० फूड पॅकेटस्‌ कोतवाली पोलिस ठाण्याच्या माध्यमातून तर ३०० फूड पॅकेटस्‌ नागपूर महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पोहचविण्यात येतात. हा आकडा दररोज बदलत असतो.

दोन किचन आणि शेकडो स्वयंसेवक
मैत्री परिवार दोन किचनच्या माध्यमातून सामाजिक अंतराचे भान राखत शेकडो स्वयंसेवकांच्या मदतीने अन्नदानाचे कार्य करीत आहे. मैत्री परिवारातर्फे संचालित सुरेंद्र नगर येथील वसतिगृहात एक स्वयंपाकघर तयार करण्यात आले आहे तर दुसरे स्वयंपाकघर धरमपेठ येथील वझलवार लॉन येथे सिटीझन ॲक्शन ग्रुपच्या सहकार्याने तयार करण्यात आले आहे. येथे निर्जंतुकीकरण नियमित करण्यात येते. या दोन्ही स्वयंपाकघरात सकाळी ५ वाजतापासून स्वयंपाकाला सुरुवात होते. दुपारी १२ वाजताच्या आत गरजूंना फूड पॅकेट पोहचविले जातात. विशेष म्हणजे हे अन्न जीवनसत्व युक्त असून त्यात वैविध्य असते. या काळात नागरिकांना श्रीखंड, बुंदीचे लाडू, या मिष्ठान्नासोबतच फळेसुद्धा दिली जातात. अन्न वितरणाच्या दृष्टीने मैत्री परिवाराने संपूर्ण शहराची विभागणी १४ झोनमध्ये केली आहे. वितरणासाठी १४ वाहने असून वाडी, हिंगणा, पारडी, उमरेड रोड, हुडकेश्वर, काटोल रोड आदी दूरवरच्या भागातही अन्न पुरविले जात आहे. विशेष म्हणजे या फूड पॅकेट्सव्यतिरिक्त १५०० अतिरिक्त चपात्याही गरजूंना पुरविल्या जातात. मागणी आल्यानंतर संबंधित व्यक्तींकडून आधार कार्ड, महाविद्यालयाचे ओळखपत्र किंवा कर्मचारी असेल तर कार्यालयाचे ओळखपत्र घेतले जाते. संबंधित व्यक्ती खरंच गरजू आहे अथवा नाही याची शहानिशा केल्यानंतरच त्याला सेवा पुरविली जाते.

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली भेट
नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी (ता. १८) सुरेंद्रनगर आणि धरमपेठ येथील दोन्ही स्वयंपाकघराला भेट देऊन मैत्री परिवार आणि कॅगच्या सेवाकार्याची प्रशंसा केली. मैत्री परिवाराचे अध्यक्ष प्रा. संजय भेंडे प्रा. प्रमोद पेंडके, कॅगचे विवेक रानडे, श्रीपाद इंदोलीकर यांच्याशी चर्चा केली. मैत्री परिवार या महासंकटसमयी करीत असलेल्या कार्याला तोड नाही. भविष्यात जर गरज पडली तर नागपूर महानगरपालिका पुन्हा काही संसाधने उपलब्ध करून देईल, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला. यावेळी त्यांनी तेथील स्वयंसेवकांशी संवाद साधून त्यांचा उत्साह वाढविला. यावेळी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त तथा नोडल अधिकारी मिलिंद मेश्राम उपस्थित होते. बंडू भगत, अमन रघुवंशी, रोहित हिमते, माधुरी यावलकर, मनीषा गाडगे, मृणालिनी पाठक, दिलीप ठाकरे, किरण संगावार, सुचित सिंघानिया, नितीन पटवर्धन आदी मैत्री परिवाराच्या माध्यमातून या सेवेसाठी अथक परिश्रम घेत आहेत.

ज्येष्ठ निराधारांसाठी विशेष सेवा
मैत्री परिवार अन्नदानासोबतच शहरातील निराधार ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सेवा पुरवित आहे. भोजनाची मागणी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ९११९५६७६७२ आणि निराधार ज्येष्ठांच्या मदतीसाठी ८६००५९०६२० हे दोन क्रमांक संस्थेने जाहीर केले आहे. निराधार वृद्धांना कुठलीही मदत हवी असल्यास त्यांनी संबंधित क्रमांकावर फोन केल्यास मैत्री परिवार त्यांना मदत पोहचवेल. दरम्यान मैत्री परिवाराने त्यांना आलेल्या कॉलच्या आधारावर बुटीबोरीतील एका ज्येष्ठ व्यक्तीला औषधी पोहचविली होती.

खबरदारी तुमची, जबाबदारी आमची…! मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे भावनिक आवाहन

नागपूर शहरामध्ये कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे. रुग्णांची संख्या वाढतेच आहे. किमान आतातरी लॉकडाऊनदरम्यान घराच्या बाहेर पडू नका. नागपूर महानगरपालिका, जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन जनतेची काळजी घेते आहे. तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो, या शब्दात नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भावनिक आवाहन करीत लोकांना सहकार्य करण्यासाठी साद दिली.
रविवारी (ता.१२) शहरात १४ नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून नागरिकांना गांभीर्य सांगितले आणि सहकार्य करण्याचे आवाहन केले.
रविवारी आढळलल्या १४ रुग्णांमध्ये चार जबलपूरचे, एक कामठी येथील आणि उर्वरित ९ नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील रुग्ण आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढल्याने आपणा सर्वांना आता आणखी जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे कुणीही विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
यासंबंधी माहिती देताना मनपा आयुक्तांनी सांगितले की, सर्व १४ ही रुग्णांना यापूर्वीच ‘क्वारंटाईन’ करण्यात आले होते. त्यांची चाचणी घेतल्यानंतर रविवारी ते कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी पूर्वीच क्वारंटाईन केल्यामुळे त्यांच्यापासून इतरत्र कोरोना पसरण्याची भीती नाही. दिल्ली येथून प्राप्त माहितीच्या आधारे २५१ व्यक्ती आणि त्यांच्या संपर्कात आलले ३० अशा एकूण २८१ व्यक्तींना ‘क्वारंटाईन’ करण्यात आले होते. दिल्ली येथून आलेल्यांमध्ये ८ जण मूळचे जबलपूरचे आहेत. या आठ जणांपैकी चौघे कोरोनाग्रस्त असल्याने निष्पन्न झाले आहे.
कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेला परिसर खबरदारीच्या दृष्टीने सील करण्यात येतो. त्यानुसार सदर रुग्ण राहत असलेला सतरंजीपुरा, मोमीनपुरा परिसर पूर्णतः सील करण्यात आला आहे. तर काही रुग्ण काटोल रोड व कामठी रोड भागातील असून तो परिसरही सील करण्यात येत आहे. संसर्ग पसरू नये यासाठी मनपातर्फे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी मनपाने टीम निर्धारित केल्या असून १४ दिवस मनपाची चमू निर्धारित परिसर, तेथील घरे आणि लोकसंख्या या सर्वांची माहिती घेऊन सर्वेक्षण करणार आहेत. तरी सर्व नागरिकांनी सर्वेक्षण करणा-या चमूला व मनपा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

दक्ष राहा, लक्षणे आढळल्यास त्वरित मनपाला माहिती द्या
नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णांची वाढती संख्या ही नागपूरकरांसाठी चिंतेची बाब आहे. त्यामुळे आता प्रत्येकाला अधिक जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. आपल्या ३० लाख लोकांचे आरोग्य आपल्याच हातात आहे. त्यामुळे या ३० लाख लोकांनाच आता ठरवायचे आहे की कोरोनाशी लढा कसा द्यायचा. संक्रमण वाढत आहे, दक्ष राहा. अशा स्थितीत घराबाहेर न पडणे जास्त संयुक्तिक आहे. जीवनावश्यक वस्तू शक्यतो फोनवरूनच घरी मागवा. बाहेर जाण्याची गरज पडल्यास मास्क वापरा, सोशल डिस्टंनसिंगचे पालन करा. कुणाच्या संपर्कात आल्यास, ताप, सर्दी, कोरडा खोकला येत असेल तर त्वरित मनपाच्या नियंत्रण कक्षाला माहिती द्या. वेळेत उपचार झाल्यास कोरोनापासून लवकर बरे होता येईल. त्यामुळे सजग राहा, निमयांचे पालन करा, प्रशासनाला सहकार्य करा, असेही आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.

नदी स्वच्छतेसोबतच नाला स्वच्छतेलाही सुरुवात

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचा पुढाकार : २२७ नाल्यांचा समावेश शहरातील नाग, पिवळी आणि पोहरा नदीचे स्वच्छता अभियान युद्धपातळीवर सुरू आहे. या नद्यांच्या स्वच्छतेसोबतच शहरातील दहा झोन अंतर्गत येणाऱ्या सुमारे २२७ नाल्यांच्या स्वच्छतेचे कार्य प्रारंभ होत आहे. त्यापैकी पाच झोनमधील १३३ नाल्यांच्या स्वच्छतेला प्रथम एप्रिल महिन्यात सुरुवात झाली आहे. नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकारातून ही स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली असून ३१ मेपर्यंत शहरातील संपूर्ण नाले स्वच्छ करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

नागपूर शहरातील दहाही झोनअंतर्गत २२७ नाले आहेत. यातील बहुतांश नाल्यांमध्ये गाळ आणि कचरा जमा झाला आहे. यामुळे नाल्याच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण होतो. मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थितीही निर्माण होते. हे सर्व टाळण्यासाठी संपूर्ण नाले स्वच्छ करण्याचा निर्णय मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतला आणि त्यानुसार निर्देश देत स्वच्छतेच्या कामालाही सुरुवात झाली आहे.
नाला सफाईचे कार्य मशीनद्वारे आणि जेथे मशीनद्वारे शक्य नाही तेथे स्वच्छता कर्मचाऱ्यांतर्फे होत आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात लॉकडाऊन सुरू असून नागरिक घरातच आहेत. लॉकडाऊननंतर जेव्हा नागरिक घराबाहेर पडतील तेव्हा नाला स्वच्छतेचे सुंदर चित्र त्यांना बघायला मिळेल, असा आशावाद आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केला.
सध्या धरमपेठ, हनुमाननगर, नेहरू नगर, गांधीबाग आणि आशीनगर या पाच झोनअंतर्गत असलेल्या १३३ नाल्यांमध्ये पाच पोकलेनद्वारे स्वच्छता सुरू करण्यात आली आहे. यामध्ये दोन टन क्षमतेची एक, चार टन क्षमतेची एक, आठ टन क्षमतेच्या दोन आणि ११ टन क्षमतेची एक मशीन कार्यरत आहे. यापूर्वी मे महिन्यात सुरू होणारी नाला सफाई यावर्षी एप्रिल महिन्यातच सुरू करण्यात आली असून ३१ मे रोजी शहरातील संपूर्ण नाले स्वच्छ करण्याचा मानस मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचा आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग, अभियांत्रिकी विभाग आणि स्वच्छता विभागाच्या समन्वयातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात येत आहे.
नाला स्वच्छतेची संपूर्ण जबाबदारी झोनचे मुख्य स्वच्छता अधिकारी, वॉर्डचे स्वच्छता निरिक्षक, वॉर्डचे कनिष्ठ अभियंता आणि यंत्र अभियांत्रिकी विभागाकडे सोपविण्यात आली आहे. नाला स्वच्छतेदरम्यान निघणारा गाळ हा परिसरातील सखल भागात टाकण्यात येणार आहे.

१० झोनमध्ये २२७ नाले
नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीतील १० झोनमध्ये २२७ नाले आहेत. लक्ष्मीनगर झोनमध्ये २२. धरमपेठ झोनमध्ये ३५, हनुमाननगर झोनमध्ये १४, धंतोली झोनमध्ये १४, नेहरु नगर झोनमध्ये १५, गांधीबाग झोनमध्ये ५१, सतरंजीपुरा झोनमध्ये २२, लकडगंज झोनमध्ये सात, आशीनगर झोनमध्ये १८ आणि मंगळवारी झोनमध्ये २९ नाले आहेत. यापैकी ७१ नाल्यांची पोकलेनद्वारे स्वच्छता करण्यात येणार आहे. अन्य नाले जेथे पोकलेन जाऊ शकत नाही अशा उर्वरीत नाल्यांची स्वच्छता मनुष्यबळाद्वारे करण्यात येईल.

१० ‘फिवर क्लिनिक’ सुरू मनपा आयुक्तांचा पुढाकार,नि:शुल्क तपासणी

नागपूर: वातावरणातील बदलामुळे ताप, सर्दी, खोकल्याने अनेक जण त्रस्त आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशी लक्षणे दिसल्याने आधीच धडकी भरते. अशा किरकोळ स्वरूपाच्या आजारांच्या तपासणीकरीता व त्यावरील उपचाराकरीता मनपातर्फे प्रत्येक झोनमध्ये एक याप्रमाणे संपूर्ण शहरात १० ‘फिवर क्लिनिक’ सुरू केले आहेत. संबंधित झोनमधील मनपाच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हे ‘फिवर क्लिनिक’ सुरू झाले आहेत. लक्ष्मीनगर झोनमध्ये जयताळा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, धरमपेठ झोनमधील के.टी.नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, हनुमान नगर झोनमधील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, धंतोली झोनमधील नरसाळा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, नेहरूनगर झोनमधील नंदनवन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, गांधीबाग झोनमधील मोमीनपूरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, सतरंजीपुरा झोनमधील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, लकडगंज झोनमधील पारडी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, आसीनगर झोनमधील कपील नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, मंगळवारी झोनमधील इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ‘फिवर क्लिनिक’ नागरिकांच्या सेवेत सुरू करण्यात आले आहेत.

वातावरणातील बदल आणि त्यामुळे उद्भवणारे आजार यामुळे अनेकांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे. या गोष्टीची दखल घेत मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकारानुसार नागपूर महानगरपालिकेतर्फे दहाही झोनमध्ये १० ‘फिवर क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहेत. या ‘फिवर क्लिनिक’ मध्ये तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे नि:शुल्क तपासणी व उपचार केले जाणार आहे.

याव्यतिरिक्त ज्या नागरिकांना खासगी रुग्णालयामध्ये तपासणी करायची असेल त्यांना मनपाद्वारे नोंदणीकृत खासगी रुग्णालय व हॉस्पिटलमध्ये जाउन तपासणी करता येईल. यासंबंधी मनपाद्वारे सर्व खासगी रुग्णालय तथा हॉस्पिटलना सेवा पुरविण्याचे निर्देश दिले आहेत.

‘फिवर क्लिनिक’ सुरू करण्यात आलेले नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र

अ.क्र. झोन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र
लक्ष्मीनगर जयताळा
धरमपेठ के.टी. नगर
हनुमाननगर नरसाळा
धंतोली बाबुलखेडा
नेहरूनगर नंदनवन
गांधीबाग मोमीनपूरा
सतरंजीपुरा जागनाथ बुधवारी
लकडगंज पारडी
आसीनगर कपील नगर
१० मंगळवारी इंदोरा

या ‘फिवर क्लिनिक’मध्ये एक एमबीबीएस डॉक्टर, एक परिचारिका, फॉर्मसिस्ट, पॅथॉलॉजिस्ट सेवा देतील. सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेमध्ये नागरिकांना नि:शुल्क सेवा देण्यात येईल. ‘फिवर क्लिनिक’मध्ये रुग्णावर आवश्यक उपचार केले जाईल. आवश्यकता असल्यास त्याच्या रक्ताचे नमूने घेतले जातील, आवश्यक औषधेही देण्यात येतील. याशिवाय तिव्र स्वरूपाचे ताप व अन्य लक्षणे दिसून आल्यास तातडीने त्याला पुढील तपासणीकरीता पाठविण्यात येईल.

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आवाहन : मास्क वापरणे आता बंधनकारक

नागपूर: कोरोनाविरुद्धच्या लढाईत स्वत:चे योद्धा बना. स्वत:ला त्रास करवून घेऊ नका. इतरांना आपल्यामुळे त्रास होणार नाही याची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क वापरा. सामाजिक अंतर पाळा. घरात प्रवेश करताना हात स्वच्छ धुवा. प्रत्येकाने कोरोनाविरुद्धची लढाई स्वत: योद्धा बनून लढायची आहे, असे भावनिक आवाहन नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.

मास्क वापरणे आता बंधनकारक

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्यांतर्गत नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बुधवारी (ता. ८) एक आदेश काढून घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे आता बंधनकारक केले आहे. या आदेशानुसार शहरातील रस्ते, रुग्णालये, कार्यालये, बाजार इत्यादी सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही हेतूने वावरणाऱ्या व्यक्तीने, खासगी किंवा कार्यालयीन वाहनाने कुठेही वावरताना तसेच कार्यालय अथवा कामांच्या ठिकाणावर मास्क परिधान करणे बंधनकारक राहील. कोणत्याही व्यक्ती, अधिकाऱ्यांनी मास्क परिधान केल्याशिवाय सभा, बैठकीला उपस्थित राहू नये. प्रमाणित मास्क औषधींच्या दुकानात उपलब्ध असून ते वापरता येतील किंवा घरी बनविलेले मास्कसुद्धा वापरता येतील. व्यवस्थित धुवून आणि निर्जंतुकीकरण केलेले मास्कदेखिल वापरता येतील, असे आदेशात नमूद केले आहे. या आदेशाचे पालन न झाल्यास भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अन्वये नागरिक कारवाईस पात्र ठरतील, असेही आदेशात म्हटले आहे. मास्क घरच्या घरी देखील सुती कापडापासून तयार करता येईल. घरच्या घरी मास्क तयार करण्याची कृती ‘मास्क इंडिया डॉट कॉम’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असेही आयुक्तांनी सांगितले.

नागपूर शहरात कोरोनाचा वाढता प्रसार रोखणे, हे केवळ नागरिकांच्या हाती आहे, असे सांगताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना शासनाने दिलेल्या निर्देशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. समाजाने एकत्रित येऊन ही लढाई लढणे गरजेचे आहे. प्रत्येकाने योद्धा बनणे गरजेचे आहे. योद्धा बनणे म्हणजे लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करणे होय. अत्यंत आवश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडावे. घराबाहेर पडताना मास्क लावणे बंधनकारक आहे. आवश्यक कामाने घराबाहेर पडलाच तर लवकरात लवकर घरात यावे. घरात प्रवेश करताना साबणाने हात स्वच्छ धुवावे. हे करणे म्हणजेच योद्धा होय. हे केलं नाही म्हणजे समाजाचे शत्रू बनणे होय. त्यामुळे समाजाचा शत्रू न बनता स्वत:चा आणि समाजाचा योद्धा बना, असे आवाहन त्यांनी समस्त नागपूरकरांना केले आहे.

घरीच राहा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आवाहन नागपुरातील परिस्थितीला गांभीर्याने घ्या;

नागपूर: नागपूर महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून एकाचा मृत्यू झाला आहे. ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. कोरोनामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी शासनाने दिलेले निर्देश पाळावे. घरात राहावे, सुरक्षित राहावे असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून नागपूर महानगरपालिका आवश्यक ती सर्व काळजी घेत आहे. कोव्हिड-१९ चे पॉझिटिव्ह असलेले रुग्ण ज्या परिसरात राहतात, त्या परिसरात राहणाऱ्या कुण्या व्यक्तीला जर बाधा झाली असेल तर ते तातडीने समोर यावे, त्यांच्यामुळे इतरांमध्ये हा विषाणू पसरु नये, यासाठी ही काळजी घेत जात असल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले. याअंतर्गत लक्ष्मीनगर झोनमध्ये १८५ चमू, धंतोली झोनमध्ये दोन चमू, गांधीबाग झोनमध्ये ३५ चमू आणि मंगळवारी झोनमध्ये २३ चमूंच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरु आहे. लक्ष्मीनगर झोनमधील २७४६३ घरांतील १०६७१९ नागरिक, धंतोली झोनमधील ५९ घरातील २७८ नागरिक, गांधीबाग झोनमधील १४९७ घरातील ७७३८ नागरिक आणि मंगळवारी झोनमधील २१४९ घरांतील ९३१४ नागरिकांची या चमूंच्या माध्यमातून दररोज माहिती घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनामुळे नागपुरात एका व्यक्तीचा मृत्यू झाला हे धक्कादायक आहे. त्यामुळे समूह संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करावे. जीवनावश्यक सर्व वस्तू मुबलक आहे. भाजीपाला, किराणा, दुध यासारख्या सेवा घरपोच मिळतील याबाबत व्यवस्था मनपाने काही व्यवसायीक व शेतकरी बचतगटाच्या माध्यमातुन केली आहे. किमान पुढील काही दिवस स्वत:वर बंधन घालणे आवश्यक आहे. यासोबतच वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ धुवावे, सॅनिटायझरचा वापर हात स्वच्छ करण्यासाठी करावा, बाहेर निघताना मास्क लावावे, असे आवाहनही मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

शहरात १७ लाख नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण

याव्यतिरिक्त दहाही झोनमध्ये ३३३ चमूंच्या माध्यमातून संपूर्ण नागरिकांची माहिती घेण्यात येत आहे. एकूण लोकसंख्येपैकी आतापर्यंत १७६१२८५ नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एकूण ४३७१९१ घरांचे सर्व्हेक्षण झाले असून दररोज सुमारे २८३९३ घरांचे सर्वेक्षण होत आहे. याव्यतिरिक्त प्रभागनिहाय ‘रॅपिड रिस्पान्स टीम’ तयार करण्यात आली असून आलेल्या माहितीच्या आधारे तातडीने संबंधित ठिकाणी पोहचून नागरिकांची तपासणी केली जाते. संपूर्ण शहरात दहाही झोन मिळून असे ३८ पथक आहे. आतापर्यंत १५३८ घरांना रॅपिड रिस्पान्स टीमने भेट दिली आहे.

८६८ पैकी ७७८ निगेटिव्ह

नागपुरात कोरोनाचे संशयित रुग्णांची संख्या वाढली आहे. आतापर्यत १२०२ नागरिकांत कोरोनाची लक्षणे आढळली. त्यापैकी १११६ व्यक्ती देखरेखीखाली आहेत. यापैकी ५९५ जणांचा १४ दिवसांचा देखरेखीचा कालावधी पूर्ण झाला आहे. ८६८ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी १८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. मंगळवारी (ता.७) पॉझिटिव्ह आढळलेला १ रुग्ण चंद्रपुरातील होता. त्यामुळे नागपुरात सद्यस्थितीत १८ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद आहे. ७७८ नमुने निगेटिव्ह आली असून ७१ नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे. ७८१ व्यक्तींना घरी पाठविण्यात आले असून ८५ व्यक्तींवर दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

मनपाच्या चमू अविरत करीत आहे गरजूंना अन्नदानाचे कार्य

दिव्यांग नागरिकांना रेशनचा पुरवठा : सेवाभावी संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे योगदान

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात सुरु असलेल्या लॉकडाऊनदरम्यान गरजू व्यक्तींना दोनवेळच्या भोजनाचा पुरवठा तसेच दिव्यांग नागरिकांना रेशनचा पुरवठा व निराधार ज्येष्ठ नागरिकांना भोजन देण्याचे कार्य नागपूर महानगरपालिका सेवाभावी संस्था आणि सामाजिका कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अविरत करीत आहेत.

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात शहरातील प्रत्येक गरजू व्यक्तींपर्यंत ही सेवा पोहचत आहे. नागपूर महानगरपालिका क्षेत्रात लॉकडाऊन कालावधीत बेघर, विस्थापित, कामगार, परराज्यातील अडकेलेले कामगार यांच्यासाठी निवारागृह, अन्न, पाणी, वैद्यकीय देखभाल आणि त्यांना इतर सुविधा देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने नागपूर शहरात असे १७२ निवारागृह उभारण्यात आले आहेत. त्याची क्षमता ६८०६ इतकी आहे. आजघडीला या निवारागृहात ५५९५ नागरिक वास्तव्यास असून दररोज ही संख्या वाढत आहे. ह्या संपूर्ण नागरिकांना दोन वेळचे भोजन पुरविण्यासाठी मनपाने २६केंद्रीय स्वयंपाकघराची व्यवस्था केली आहे. निवारागृहात असलेल्या आणि झोपडपट्यामधील गरजू व्यक्तींनाही या स्वयंपाकघराच्या माध्यमातून अन्न पुरविण्याचे कार्य मनपाच्या चमू दिवसरात्र करीत आहे. ४ एप्रिल रोजी निवारागृहातील ५५५६, झोपडपट्ट्यातील ९९०५ असे एकूण १५४६१ नागरिकांना अन्न पुरवठा करण्यात आला. ५ एप्रिल रोजी निवारागृहातील ५५७८ आणि झोपडपट्टीतील ११४३६ अशा एकूण १७०१४ नागरिकांना आणि ६ एप्रिल रोजी निवारागृहातील ५५९५ आणि झोपडपट्टीतील १५९४७ अशा एकूण २१५४२ नागरिकांना दोन वेळचे भोजन पुरविण्यात आले.

दिव्यांगांना रेशन तर निराधार ज्येष्ठांना भोजन व्यवस्था
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकारातून चार दिवसांपूर्वी दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांनाही मदतीसाठी विशेष हेल्पलाईन सुरू करण्यात आली. यामाध्यमातून आतापर्यंत ४० दिव्यांग आणि ज्येष्ठ व्यक्तींनी मदत मागितली असून मनपाच्या माध्यमातून दिव्यांग नागरिकांपर्यंत रेशन कीट पोहचविण्यात आली आहे. याव्यतिरिक्त अन्य २२०० कुटुंबांनाही रेशन किट पुरविण्यात आली आहे. रेशन किट मध्ये गव्हाचे पीठ (५ कि.ग्रॅ.), तांदूळ (२.५ कि.ग्रॅ.), डाळ (१.२५ कि.ग्रॅ.), मिरची पावडर (२५० ग्रॅम), हळद पावडर (१२५ ग्रॅम), मसाला (२५० ग्रॅम), मीठ (२५० ग्रॅम), खाद्य तेल (१ कि.ग्रॅ.), कांदे (२ कि.ग्रॅ.), आलू (२ कि.ग्रॅ.) या वस्तूंचा समावेश असून प्रत्येक कुटुंबाला सात दिवस पुरेल इतकी ही व्यवस्था आहे. तसेच निराधार ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन दोन वेळचे स्वादिष्ट भोजन स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून देण्यात येत आहे.

सामाजिक संस्थांनी दिले दान
लॉकडाऊनदरम्यान गरजूंना मदत व्हावी यासाठी अनेक सामाजिक संस्थांनी पुढे येऊन दान दिले आहे. आतापर्यंत रोटरी क्लब, पॉवर ऑफ वन वेलफेअर फाऊंडेशन, मे. एस. एस. कुळकर्णी ॲण्ड असोशिएटस्‌, मे. कृष्णा ट्रेडिंग कंपनी, लॉयन्स क्लब यांच्या माध्यमातून ११४०० कि.ग्रॅ. गव्हाचे पीठ, ११२०० कि.ग्रॅ. तांदूळ, ५६०० कि.ग्रॅ. डाळ, ३३३० कि.ग्रॅ. तेल, ५५२० कि.ग्रॅ. मीठ, ९००० नग साबण, १०८.३ कि.ग्रॅ. हळद, ११८.३ कि.ग्रॅ. मिरची पावडर, २० कि.ग्रॅ. मसाला, १११०० कि.ग्रॅ. कांदे आणि १११०० कि.ग्रॅ. आलू नागपूर महानगरपालिकेला प्राप्त झाले आहेत. मॉईलने १० लाख रुपये दिले असून १५०० अन्न पॅकेट दररोज वितरीत करीत आहेत. विजय ढवंगळे आणि अजय ढवंगळे यांनी १० लाख रुपये आणि श्री रमण यांनी १२५०० रुपये दान दिले आहेत. मे. इस्कॉन, अन्न अमृत फाऊंडेशन, प्रियदर्शिनी बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था, संस्कार बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था, शगून महात्मा औद्योगिक सहकारी संस्था, नागपूर महिला सहकारी सनसञथा, मैत्री परिवार आदींच्या माध्यमातून अन्न तयार केले जात आहे.

मुलाच्या मदतीसाठी परदेशातील महिलेचा ई-मेल
लॉकडाऊनमध्ये नागपुरात अडकलेल्या एका परदेशातील विद्यार्थ्याच्या आईचा ई-मेल नागपूर महानगरपालिकेला प्राप्त झाला. त्या मेलमध्ये मोबाईल क्र. किंवा सविस्तर पत्ता नव्हता. केवळ संबंधित विद्यार्थी हजारी पहाड परिसरात राहतो, असा उल्लेख होता. केवळ या माहितीच्या आधारे मनपाच्या चमूने ग्रो व्हिल फाऊंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्याचा पत्ता शोधून काढला आणि त्याला आवश्यक ते सामान पोहचविले. असेच एक उदाहरण वृद्ध महिला व तिच्या नातवांचे आहे. नातवांसोबत राहणाऱ्या या वृद्ध महिलेच्या नातवांनीही मदतीसाठी आर्जव केली. त्यांनाही दिवसरात्र भोजन पुरविण्याचे कार्य मैत्री परिवार संस्थेच्या माध्यमातून मनपा करीत आहे.

गुगल शीटच्या माध्यमातून संनियंत्रण
नागपूर शहरातील एक नागरिक शोबीत चांडक यांनी नागपूर महानगरपालिकेच्या या सेवाभावी कार्यात स्वत:चेही योगदान दिले आहे. मनपाची मदत योग्य ठिकाणी पोहचते की नाही याचे मॉनिटरींग करण्यासाठी त्यांनी एक गुगल शीट मनपा अधिकाऱ्यांना तयार करून दिली. कलर कोडच्या माध्यमातून झोननिहाय त्यात माहिती अपडेट केली जाते. दररोज येणारी मागणी आणि होणारा पुरवठा याबाबत यात अपडेट होत असून जर गरजूला मदत मिळाली नाही तर लगेच ते नोडल अधिकारी तथा उपायुक्त मिलिंद मेश्राम यांना माहिती होते. मग तातडीने संपर्क करुन त्यांना मदत पोहचविली जाते.

दान आणि मदतीसाठी करावा संपर्क
नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येणारे सेवाकार्य समाजसेवी संस्था आणि दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून सुरू आहे. ज्यांना या सेवाकार्यात दान द्यायचे आहे अथवा ज्या गरजूंना मदत हवी आहे त्यांनी ०७१२-२५३९००४, ९४२२६४११०१, ७०२८०३३८७२, ९८२३३३०९३४ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

जीवनावश्यक वस्तुंचा नागरिकांना सुरळीत पुरवठा व्हावा

‘कोराना’च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनदरम्यान नागरिकांची फरफट होता कामा नये. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी व्यापारी संघटनांनी पुढाकार घ्यायला हवा. काळाबाजार होता कामा नये. तसे लक्षात आल्यास व्यापारी संघटनांनीच अशा व्यापाऱ्यांवर स्वत:हून कारवाई करावी, असे आवाहन करीत प्रशासनातर्फेही अशा व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला.

नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहावा, त्यात कुठलाही खंड पडू नये, घरपोच सेवेला प्राधान्य मिळावे, यासाठी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विविध व्यावसायिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आमंत्रित केले आणि परिस्थितीचा आढावा घेतला. आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, कोरोनाचे संकट देशावर आले आहे. नागपुरातही त्याची व्याप्ती आहे. त्यामुळे पुढील कालावधी विचारात घेऊन नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तूंच्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी व्यापाऱ्यांवर आहे. या काळात नागरिकांची पिळवणूक होता कामा नये. यावर आता व्यापाऱ्यांनीच अंकुश आणायला हवा व सामाजिक बांधिलकी जपावी.
व्यापाऱ्यांना जर वितरण , उत्पादन आणि वाहतूकसंदर्भात काही अडचणी असेल तर त्या प्रशासनाला नक्की सांगाव्या. ऑनलाईन लिंक देऊन घरपोच सेवा देता येईल का, याचा व्यापाऱ्यांनी अवश्य विचार करावा. नागरिकांना भाजीबाजारात जायची गरज पडू नये, अशी व्यवस्था मनपाने केली. घरपोच किंवा घरासमोर भाजीपाला नागरिकांना मिळतो आहे, त्यादृष्टीने अन्य व्यापाऱ्यांनीही विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
व्यापारी प्रतिनिधींनीही आपली भूमिका यावेळी मांडली. सध्या मागणी कमी आहे. परंतु पुढील काही महिने पुरेल इतका साठा उपलब्ध आहे. फक्त सध्या बाजारात कमी प्रतीचा गहू उपलब्ध आहे. चांगल्या प्रतीचा गहू मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये आहे. वाहतूक नियमित झाल्यास तेथून तो गहू उपलब्ध होऊ शकेल. व्यापारी त्यांच्या सेवा देत आहेत. माल आला तरी ते उतरविण्यासाठी मजूर मिळत नाही, अशा अडचणी त्यांनी मांडल्या.
यावर बोलताना आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला प्रतिबंध नाही. चांगला गहू जेथून मागवायचा आहे तेथून मागवा. काही अडचण आली तर तेथील जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यावर मार्ग काढण्यात येईल. व्यापाऱ्यांनी व्यापार करताना स्वत:चेही आरोग्य जपावे व इतरांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने सामाजिक अंतर पाळावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रादेशिक परिवहन अधिकारी दिनकर मनवर यांनी वाहतूक परवानगीसंदर्भात माहिती दिली. प्रादेशिक परिवहन कायारलयात २४ बाय ७ नियंत्रण कक्ष कार्यान्वित आहे. ०७१२-२५६१६९८ असा तेथील क्रमांक आहे. यासोबतच ८१०८६८३९१९ या क्रमांकावरही संपर्क साधता येईल. वाहनाची पास ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करता येईल. त्यासाठी mh31@mahatranscom.in यावर अथवा https://transport.maharashtra.gov.in या वेबलिंकवर जाऊन अर्ज करता येईल, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी दिनकर मनवर यांनी दिली.
बैठकीला प्रादेशिक परिवहन अधिकारी दिनकर मनवर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त चं.भा. पवार, प्रभारी सह आयुक्त (औषधे) प्र. ना. शेंडे, प्रभारी सहायक आयुक्त अभय देशपांडे, सहायक कामगार आयुक्त एन.पी. मडावी, जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसचिव प्रशांत नेरकर, होलसेल ग्रेन ॲण्ड सीडस्‌ मर्चंट असोशिएशनचे अध्यक्ष संतोषकुमार अग्रवाल, सचिव प्रताप मोटवानी, नागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोशिएशनचे राजेंद्र कावडकर,वीरभान केवलरामानी, महाराष्ट्र राज्य केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोशिएशनचे श्रीकांत दुबे, नागपूर चिल्लर किराणा व्यापारी संघाचे ज्ञानेश्वर रक्षक, नागपूर कन्फेक्शनरी बेकरी व नमकीन असोशिएनशचे प्रदीप धमकानी, बेकरी असोशिएशनचे विजय ग्वालानी यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

मनपा आयुक्तांनी वाढविले आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोबल सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची घेतली भेट : काळजी घेण्याचा दिला प्रेमळ सल्ला

नागपूर: नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोमवारी (ता. ६) घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांचे मनोबल वाढविले. ३० लाख नागपूरकरांची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:चीही काळजी घ्या, असा प्रेमळ सल्ला देत सर्व कर्मचाऱ्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला.

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची ही भेट आकस्मिक होती. कोरोनाविरुद्धचा लढा लढणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्याच्या हेतूने त्यांनी सर्व्हेक्षणाला निघण्याच्या वेळेवर आयसोलेशन हॉस्पीटलमध्ये पोहोचून त्यांच्याशी संवाद साधला. समोर अचानक आयुक्त तुकाराम मुंढे यांना बघून तेथे उपस्थित आणि सर्वेक्षणाला निघण्याच्या हेतूने बसमध्ये बसलेले सारेच कर्मचारी अवाक् झाले. विशेष म्हणजे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्वत: बसमध्ये चढून सर्व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या कामाचे कौतुक करीत सर्वांशी हितगूज साधले. आपल्याला आपला जीव धोक्यात घालून कार्य करावे लागत आहे. त्यामुळे आपली काळजी आपणच घ्यायला हवी, असे म्हणत एका सीटवर एकाच महिलेने बसण्यास सांगत निर्देशाचे पालन करण्यास सांगितले. सगळयांना कोविड-१९ च्या गाइडलाइन्स प्रमाणे सर्वेक्षण मध्ये माहिती गोळा करण्याचा सल्ला देत आयुक्त म्हणाले कि नागपूरकरांची आशा तुमच्यावर आहे. आपल्या सगळयांना मिळून कोरोनाच्या संकटातून बाहेर पडायचे आहे.

यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील इतर भागाचाही दौरा केला. यात त्यांना जेथे-जेथे लोकं एकत्र गर्दी करून दिसलीत तेथे गाडीतून उतरून त्यांना ‘सोशल डिस्टंसिंग’चे धडे दिले. ‘कोरोना’ला हरविण्यासाठी, साखळी तोडण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे सांगत लॉकडाऊनदरम्यान घराच्या बाहेर पडू नका, असे आवाहन केले.

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सकाळीच शहर पालथे घातले. मानेवाडा परिसरात एका रेशन दुकानासमोर धान्य घेण्यासाठी गर्दी असल्याचे दिसले. तेथे सामाजिक अंतराचे पालन करण्यात येत नसल्याचे लक्षात येताच ते स्वत: तेथे पोहोचले. सर्वांना तीन-तीन फुटाच्या अंतरावर उभे करून सामाजिक अंतराचे पालन करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी गर्दी टाळण्याचे आवाहन केले. राशन दुकानदाराला तातडीने दुकानासमोर तीन-तीन फुटावर खुणा करण्यास सांगितले.

अनेकांना आश्चर्याचा धक्का

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या ‘लॉकडाऊन’ची अंमलबजावणी व्हावी यासाठी मनपा आयुक्त मुंढे स्वत: शहरात फिरत असल्याचे बघून सर्वांनाच आश्चर्य वाटले. गर्दी असलेल्या ठिकाणी गाडी थांबल्याचे बघताच आणि त्यातून येणारा व्यक्ती दुकानाकडे येत असल्याचे बघून अनेकांना सुरुवातीला काही कळलेच नाही. मात्र, दुकानात पोहोचल्यावर ते मनपा आयुक्त तुकाराम मुंढे असल्याचे लक्षात येताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

मास्क लावल्याशिवाय घराबाहेर पडू नका !

जीवनावश्यक वस्तू तसेच अन्य अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडताना मास्क वापरूनच जावे. मास्क लावल्याशिवाय कुणीही घराबाहेर पडू नका, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

यासंबंधी एक व्हीडिओ संदेश आयुक्तांनी जारी केला आहे. यामध्ये मनपा आयुक्तांनी कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांना १०० टक्के लॉकडाऊन पाळण्याचे आवाहन केले आहे. केवळ लॉकडाऊनचे पालन केल्यानेच आपण या संक्रमणापासून स्वत:चा बचाव करू शकतो.
जीवनावश्यक वस्तुंसाठी नागरिकांना घराबाहेर पडावे लागू नये म्हणून प्रशासनाने या वस्तू घरपोच मिळण्याचा प्रयत्न केला आहे. तथापी नागरिकांना या वस्तुंसाठी किंवा अन्य अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडायचे झाल्यास त्यांनी मास्क लावूनच बाहेर निघावे. वापरण्यात येणारा मास्क हा विकतच घेतला पाहिजे असे नाही. तर हा मास्क आपल्याला घरच्या घरी देखील सुती कापडापासून तयार करता येईल. घरच्या घरी मास्क तयार करण्याची कृती ‘मास्क इंडिया डॉट कॉम’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असेही आयुक्तांनी सांगितले.

Exit mobile version